भोयर येथील ‘ई-क्लास’ वस्तीत पाण्यासाठी वणवण; प्रशासनाने दखल न घेतल्यास जनआक्रोश मोर्चाचा इशाराखचलेल्या विहिरीच्या बांधकामाअभावी पाणीसाठा वाया; रमेश पेटकुले, कैलास राठोड, यशवंतराव शिंदे, अंकुश तराळे व श्रीकृष्ण भिवनकर यांच्यासह ग्रामस्थांचा संतापयवतमाळ (प्रतिनिधी) :यवतमाळ जिल्ह्यातील भोयर येथील ‘ई-क्लास’ वस्तीमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट समस्या निर्माण झाली आहे. वस्तीतील चारपैकी दोन बोरवेल पूर्णपणे कोरड्या पडल्या असून उर्वरित दोन बोरवेलला अत्यंत तुटपुंजे पाणी येत आहे. कोरड्या दुष्काळामुळे भूजल पातळी खोलवर गेल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास वस्तीतील नागरिकांच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा रमेश पेटकुले, कैलास राठोड, यशवंतराव शिंदे, अंकुश तराळे आणि श्रीकृष्ण भिवनकर यांच्यासह ई-क्लास वस्तीतील नागरिकांनी दिला आहे.प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या कोरड्या दुष्काळामुळे वस्तीतील जलस्रोत आटले आहेत. चार बोरवेलपैकी निम्म्या बोरवेल बंद पडल्या असून, सुरू असलेल्या दोन बोरवेलमधून केवळ थोडेच पाणी मिळत असल्याने वस्तीची तहान भागत नाही.गेल्या वर्षी वस्तीतील नागरिकांनी स्वतःच्या लोकवर्गणीतून एक विहीर खोदली होती. विशेष म्हणजे त्या वेळी विहिरीला मुबलक पाणीही लागले होते. मात्र, योग्य वेळी आणि शासकीय स्तरावरून बांधकाम न झाल्याने ती विहीर पूर्णपणे खचून गेली. वेळेवर बांधकाम झाले असते तर ही विहीर खचली नसती आणि आज वस्तीतील पाण्याची समस्या इतकी तीव्र झाली नसती, अशी खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.पाण्याच्या या गंभीर प्रश्नाबाबत वस्तीतील नागरिकांनी यापूर्वीच यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही ठोस सुविधा किंवा कार्यवाही झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सध्या प्रशासकीय स्तरावर तातडीची पावले उचलून वस्तीसाठी पर्यायी पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच खचलेल्या विहिरीचे बांधकाम व दुरुस्ती करून पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी मागणी होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न निकाली काढावा, अन्यथा तीव्र जनआक्रोश मोर्चा छेडण्यात येईल, असा इशारा भोयर ई-क्लास येथील नागरिकांनी दिला आहे.